शिर्डी( प्रतिनिधी) श्रीपाद शिव कुटीचे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी भर पावसात श्रावणी पाचव्या सोमवारी, साधकांसह उंच हरिचंद्र गडावर जाऊन श्रीहरीचंद्रेश्वराचे दर्शन घेत जलाभिषेक व पूजा करत सर्वांना सुख शांती समृद्धी मिळू दे म्हणून प्रार्थना केली.
अ.नगर, नाशिक ,ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या अ.नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निसर्गरम्य व ऐतिहासिक ,धार्मिक, पौराणिक, असे महत्त्व असणारे हरिचंद्र गड सध्या पावसाळ्यामध्ये हिरव्यागार वनराईने नटले असून पावसाची संततधार , डोंगरकड्या वरून पडणारे पांढरे शुभ्र धबधबे ,झाडा फुलांचा सुगंध, नक्कीच वेधून घेणारा व स्वर्गाची आठवण करून देणारा ठरत आहे. अशा या हरिश्चंद्र गडाची भ्रमंती श्रावणी पाचव्या सोमवारी ,सोमवती अमावस्येला, पोळ्याच्या दिवशी व्हावी म्हणून श्रीपाद शिवकोटीचे महंत आत्मारामगिरीजी महाराज उर्फ अशोक महाराज निर्मळ यांनी आपले सोबती माधव हसे,व त्यांच्या सौभाग्यवती ,त्याचप्रमाणे सेवक किशोर भाऊ अहिरे यांच्यासह हरिश्चंद्रगडावर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शांततेचा अनुभव घेत सोमवारी श्री हरिश्चंद्रेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेतला.
श्री हरिश्चंद्रेश्वर हे हरिचंद्र गडावर असून राजा हरिश्चंद्र तसेच राणी तारामती व रोहिदास यांनी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे बोलले जाते. येथिल
मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. येथे साधू संतांनी एकदा तरी यावे. असे म्हटले जाते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बारा नद्यांच्या उगमस्थानी बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये म्हणजे डोंगरातील एक प्रकारच्या गुफा मध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये सुमारे दहा ते बारा फूट उंच अशी भलीमोठी श्री महादेवाची पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. सभोवती प्रदक्षिणा मारता येते.
अशा या ठिकाणी मुळा नदीचा उगम झाल्याचेही बोलले जाते. हरिचंद्र गड निसर्गरम्य व काहीसा खडतर पाऊलवाटेचा, उंच, जंगलातून ,मजल दरमजल करत हरिचंद्र गडावर पोहोचता येते. राजुर, पाचनई मार्गे किंवा कोतूळ, कोथळा मार्गे किंवा ओतूर ,पिंपळगाव मार्गे हरिचंद्र गडावर जाता येते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. पावसाळ्यात येथे गडावर जाणारे भक्त ,पर्यटक यांची संख्या फारच कमी असते. कारण येथे पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे निसरडे रस्ते तयार होतात. त्यामुळे रिस्क वाटते. मात्र अशा परिस्थितीतही श्रावणाच्या पाचव्या सोमवारी महंत आत्मारामगिरीजी महाराज उर्फ अशोक महाराज निर्मळ यांनी आपल्या बरोबर साधक घेऊन पाचवा श्रावणी सोमवार ,सोमवती अमावस्या ,पोळा सण असा मूहूर्त साधून हरिश्चंद्रगड, पावसाची तमा न बाळगता गाठला. तेथे डोंगराच्या गुहेत (घळीत)असणारे दहा ते बारा फुटी शिवलिंग व चोहोबाजूने गुडघ्या इतके थंडगार पाणी, त्यामध्ये स्नान करून शेजारीच असलेल्या पुरातन व हेमाडपंथी पूर्वमुखी अशा श्री हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेऊन तेथे जलाभिषेक केला.व सर्वांसाठी सुख शांती आणि समृद्धी मिळू दे! अशी तेथे श्री हरिश्चंद्रेश्वरला प्रार्थना केली. भर पावसात हरिश्चंद्रगड सर करून दर्शन झाल्याने मोठे आत्मिक समाधान लाभले. शंभू महादेवाच्या शक्तीने हे शक्य झाले.
असे श्रीपाद शिवकुटीचे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी सांगितले.
0 Comments