नगर मनमाड महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने चांगल्या पद्धतीने बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे शिर्डी ग्रामस्थ ,साईभक्त व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शिर्डी शहरात नगर मनमाड रस्ता अनेक ठिकाणी मोठा खराब झाला होता. विविध ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमी घडत होते. या खड्ड्यांसंदर्भात दैनिक साई दर्शन ने वारंवार आपल्या वृत्तपत्रातून आवाज उठवला होता. त्याचप्रमाणे लहुजी सेनेच्या वतीने जागरण गोंधळ तसेच भीक मांगो आंदोलन करत या खड्ड्यासंदर्भात आंदोलने केली होती. शिर्डी नगर परिषदेलाही या संदर्भात निवेदने देण्यात आली होती. मात्र नगर मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शासना कडून होणे अपेक्षित होते. मात्र शासनाकडून लवकर खड्डे बुजवण्यात येत नसल्यामुळे शिर्डी नगर परिषदेने पुढाकार घेत मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी शिर्डी शहरात नगर मनमाड रस्त्यावर अपघाताला कारणीभूत ठरत असलेले मोठ मोठे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला व ते आज गुरुवारपासून बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हजार रूम जवळील मोठा खड्डा तसेच बंधन हॉटेल समोरील मोठा खड्डा तसेच सिद्धांत हॉटेल समोरील पुलाजवळ असणारा अत्यंत खराब रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून चांगला करण्यात येणार आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे होणारे अपघात टळणार आहेत. साई भक्तांची ,दैनिक साई दर्शनची तसेच लहुजी सेनेची ,साई भक्तांची, ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिर्डी नगर परिषदेने हा निर्णय घेतला असून शासनाचे किंवा जागतिक बँक बांधकाम विभागाचे हे काम असतानाही शिर्डी नगरपरिषद स्वतः खर्च करून हे खड्डे बुजवण्याचे काम माणुसकी नात्यातून करत असल्याची माहिती यावेळी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे. आज गुरुवारच्या मुहूर्तावर शिर्डीतील नगर मनमाड रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ साईभक्त वाहनधारकांमधून मोठे समाधानही व्यक्त होतांना दिसून येत होते.
0 Comments