अहमदनगर येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आढावा बैठक!शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत-ना. राधाकृष्ण विखे पा.

नगर (प्रतिनिधी )अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊन सर्वसामान्यांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात. यासाठी शासकीय यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागणीनुसार विकास निधी देण्यात येतो. या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अशी कामे केली जावीत तसेच चालू वर्षात मंजूर असलेल्या नीधीसाठीचा प्रस्ताव महिनाभराच्या आत सादर करण्याचे निर्देशही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते .त्या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. या आढावा बैठकीसाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते,मा आ. प्राध्यापक राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावडे, अप्पर जिल्हाधिकारी श्री मापारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, चालू वर्षांमध्ये जिल्ह्यासाठी 557 कोटी रुपयांचा नियत मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर संपूर्णपणे खर्च होईल. या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. अनेक विभागांनी निधीची मागणी केलेली नसून ती तातडीने करण्याबरोबरच गत वर्षातील निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र हे तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. शेतकऱ्यांच्या प्रति शासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असून त्यांच्या हिताच्या योजना राबविण्यास प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांचे आर्थिक जीवन उंचवावे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करण्यात यावा. पारंपारिक शेती बरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा जोडधंदा असून जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
या आढावा बैठकीत विविध योजना संदर्भात आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच विविध सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे