राहाता तालुक्यातील लोहगाव जवळ तांबेनगर ते प्रवरानगर कारखाना कडे जाणाऱ्या रस्त्याने फिरत असताना तीन जणांनी आवाज देऊन तुम्ही का थांबले नाहीत याचा राग धरून दोन जणांवर धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे लोहगाव व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात चाकू हल्ला करणाऱ्या तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात लोणी पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील लोहगाव येथील विठ्ठल नगर येथील राहणारे रविराज राजेंद्र क्षेत्रे वय 28 यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मी व माझा मित्र दीपक विश्वास खरात आम्ही दोघे 6 फेब्रुवारी 2023 रोजी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान तांबे नगर ते प्रवरा कारखान्याच्या कडे जाणाऱ्या रस्त्याने पायी फिरत असताना तांबे नगर चौकात पीपीएस कॉर्नर येथे आल्यावर येथे चौकात उभे असलेल्या आरोपी अमर बाळू भोसले राहणार प्रवरानगर, आसिफ उर्फ नन्या सय्यद राहणार लोहगाव व शाहरुख शेख ,राहणार लोणी बुद्रुक तालुका राहता यांनी दीपक खरात यास शिवीगाळ करत इकडे ये असे म्हणून बोलवले असता आपण व दीपक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेलो मात्र वरील तीनही आरोपी हे मोटरसायकलवर पाठीमागून आले व त्यांनी जबरदस्ती थांबवुन तुम्ही आमचं ऐकलं नाही.पुढे कसं काय निघून आला. त्यामुळे आमची इज्जत गेली .आता त्याची भरपाई तुला करावी लागेल असे म्हणून आरोपी अमर बाळू भोसले याने दीपक यास तू आमचा अपमान करतोस काय आज तुला भोसकून टाकतो असे म्हणून शिवीगाळ करत त्याच्याकडील लांब चाकूने दीपक यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सपासप त्याच्यावर वार करून दीपक खरात यास गंभीर जखमी केले त्यानंतर दीपक यास आपण वाचवत असताना आपल्या उजव्या हातावर वार लागून दुखापत झाली आहे. अशा आशयाची फिर्याद लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर वरील तीनही आरोपींविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 91/ 2023 भादवि कलम ३०७/ ३४१/ ३५२/३२४/ ५०४ /५०६/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करत आहेत. दरम्यान जखमी दीपक खरात व रविराज क्षेत्रे यांना लोणी येथील हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून शहराप्रमाणे ग्रामीण भागातही आता असे विनाकारण दहशत निर्माण करण्यासाठी चाकू हल्ले, शिवीगाळ, मारहाण होत आहे. असे प्रकार घडू नये व असे दहशत निर्माण करणारे, गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर आळा बसावा यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालावे. पोलिसांनी तसे निर्देश द्यावेत व असे प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनीही अधिक कठोर भूमिका घ्यावी. नागरिकही सहकार्य करतील .मात्र विनाकारण गुंडगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी आता लोहगाव व परिसरातून होत आहे.
0 Comments