शिर्डी व परिसरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी होत आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी म्हणजे बुधवारी 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी बारा वाजता ठीक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भजने ,भक्ती गीते, गवळण ,आरती,व श्रीरामाचा जयजयकार करत, हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला.
आज बुधवारी श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्यदिवशी श्री मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर,गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला. त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पाळण्यामध्ये श्रीरामाची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले.व पाळणा हलवण्यात आला. यावेळी सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्र की जय, रघुपती राघव राजाराम पतित पावन सियाराम! असा जयजयकार करण्यात आला.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साई भक्त, ग्रामस्थ , उपस्थित होते.
शिर्डी शहरातील विविध उपनगरातही श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून येत होते.
0 Comments