आश्‍वी खुर्द येथे गौराई स्थापनेतून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ संदेश ! सर्वत्र या देखाव्याची चर्चा!


राहाता (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील दातीर कुटुंबाने गौराईची स्थापन करत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासह विविध सामाजिक संदेश दिले.  त्यामुळे हा सुंदर संदेश देणारा देखावा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविक महिला आणि मुली त्यांच्या घरी गर्दी केली होती. तीन दिवस हा देखावा मोठा आकर्षक व चर्चेचा ठरला होता.
दीपक दातीर, पत्नी ज्योती दातीर व त्यांची दोन मुले यांच्या संकल्पनेतून दातीर कुटुंबाने गौराई निमित्ताने सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची निर्मिती केली . यामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने रेखाटण्यात आला असून याठिकाणी राजमाता जिजाऊ माँसाहेब, झांसीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, दिवंगत महिला पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच भारतीय वंशांच्या पहिल्या अंतराळवीर महिला कल्पना चावला यांचे फोटो लावुन त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन महिला आणि मुलींना करण्यात आले. त्याबरोबर अत्याचार, ॲसिड हल्ला, सासरी होणारा महिलांचा छळ, गर्भातचं मुलींची भ्रुण हत्या यावर या देखाव्यांच्या माध्यमातून भाष्य करण्यात आल्याचे दिसत होते.
दरम्यान हा सुंदर देखावा निर्मितीसाठी जयललित तक्ते यांनी परिश्रम घेतले. मागील अनेक वर्षापासून दातीर कुटुंब हे गौराईची स्थापना करत आहे. यावर्षी त्यांनी सामाजिक संदेश देण्याबरोबरच गौराई निमित्त आकर्षक फुलांची सजावट, नैवेद्याची अप्रतिम मांडणी केलेली असल्याने हा देखावा पाहण्यासाठी आश्‍वी पंचक्रोशीतील भाविक महिला व मुलींनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी गौराईची स्थापना, बुधवारी पूजन, नैवेद्य करून, आज गुरुवारी तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे