राहुरी / प्रतिनिधी : राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून उद्या दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांनी सांगितले आहे.
२२३ राहुरी विधानसभा निवडणुकीत एकूण ३०८ मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान केंद्रे कार्यान्वीत असणार असून १लाख ६८ हजार ६५ पुरूष मतदार १ लाख ५५ हजार ९९३ महिला मतदार असे एकूण ३ लाख २४ हजार ५९ मतदारांची संख्या आहे. मतदान अधिकारी व कर्मचारी यांची एकूण ३०८ पथके तयार करण्यात आली असून यात एका पथकात ६ अधिकारी व कर्मचारी असणार आहेत (१ मतदान केंद्राध्यक्ष, १ मतदान अधिकारी, २ इतर मतदान अधिकारी, १ पोलिस कर्मचारी, १ शिपाई) या पथकासाठी एकूण १४० वाहने यात ४२ बस, १३ जीप, ८ क्रुझर, १२ मीनीबस, २८ सेक्टर अधिकारी, ७ क्यु. आर. टी., वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या आंत मोबाईल वापरण्यास पुर्णपणे बंदी असणार आहे. मतदारांना मतदार यादीत नांव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in ही वेबसाईट उपलब्ध असणार आहे. दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर ग्रामपंचायत मार्फत व्हील चेअर्स उपलब्ध असणार आहे. मतदान केंद्रावर वैधकीय पथक (आशावर्कर) तसेच महिला मतदारांना मदतनीस म्हणून अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत ठरवून देण्यात आली आहे. निवडणूक ओळखपत्र म्हणून १२ पुरावे ओळखपत्र म्हणून मतदारांची ओळख पटविण्यासाठी वापरण्यात येतील. यात आधारकार्ड, पॅनकार्ड, दिव्यांग ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, निवृत्तीवेतन दस्तऐवज, मनरेगा रोजगार ओळखपत्र, शासन, सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपनीकडून कर्मचा-यांना वितरीत छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, बॅक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड, संसद/ विधानसभा/ विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरीत केलेले अधिकृत ओळखपत्र यांचा यात अंतर्भाव आहे.
मतमोजणी दिनांक. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वा. ईनडोअर स्पोर्टस हॉल, लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्टस, सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, राहुरी येथे होणार असून यासाठी ई.व्हि. एम. १४, पोष्टल ६ व ई.टी.पी.बी.एस. ६ असे टेबल असणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण २२ फे-या निर्धारीत केल्या असून यासाठी ई.व्ही.एम. मायक्रो ऑब्झव्हर १४, पर्यवेक्षक १४, सहाय्यक १४, शिपाई ६, पोष्टल मतदान मतमोजणीसाठी पर्यवेक्षक ६, सहाय्यक ६,
ई.टी.पी.बी.एस. मतदान मतमोजणीसाठी पर्यवेक्षक ६, सहायक ६, रो ऑफीसर २ असे मतमोजणी अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी आपल्या ठरवून दिलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्याचे आवाहनही निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांनी केले आहे.
0 Comments