*उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी सर्व्हेक्षण करा-ना.विखे पाटील*


*लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे  कालमर्यादेत पूर्ण करावीत* 

लोणी  ( प्रतिनिधी)

गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या उपसा सिंचन योजना अधिक कार्यक्षमतेने सुरू राहाव्यात यासाठी या योजनांचे पुन्हा सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. या योजनांच्या कार्यक्षमता  वाढीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना  जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या.

गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ कडील विविध विषयाबाबत सन्माननीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने जलसंपदा  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेवून विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या.

 
जलसंपदा मंत्री  श्री. विखे पाटील म्हणाले, सन्माननीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघात मागणी केलेली कामे ही लोकहिताची असतात. या कामांच्या मंजुरीमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा व जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याने ही कामे कालबध्द रीतीने  पूर्ण झाली पाहिजेत. ज्या योजनांच्या कामासाठी  सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे त्याचा प्रस्ताव सादर करावा. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे, दुरुस्ती करणे या कामात तज्ञांचे मत घ्यावे. पूर संरक्षक भिंत बांधणे बाबत सर्व्हे करावा.

राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने अनेक  योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांची कामे गतीने व दर्जेदार व्हावीत. ही कामे जलद गतीने होण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी  दिल्या. योजनांसाठी आवश्यक भूसंपादन कालमर्यादेत होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले. 

बैठकीस अपर मुख्य सचिव दिपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोले, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरामणवार, जलसंपदा सह सचिव संजीव टाटू, अभय पाठक,  उपसचिव प्रवीण कोल्हे यांच्यासह  कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००००

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे