राज्यातील बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश; सिंघम पीआय संजय ठेंगेंच्या पथकाची दमदार कामगिरी; तब्बल ७० लाखांच घबाड मिळालं

 

राहुरी (प्रतिनिधी) : राहुरीच्या पोलीसांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या टिमने यशस्वी कामगिरी करत राज्यातील बनावट नोटांचे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचे मशीन व इतर साहित्य असा तब्बल सत्तर लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
  यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग व इतर सूचनांच्या अनुषंगाने दिनांक २८ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याचे सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस पथक राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन नंबर एम एच ४५ वाय ४८३३ ही मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरी कडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत. लगेच त्यांनी पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून, तीन संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (३३) राहणार सोलापूर, राजेंद्र कोंडीबा चौघुले (४२) रा. कर्जत जिल्हा अहिल्यानगर तात्या विश्वनाथ हजारे (४०) रा. पाटेगाव तालुका कर्जत यांना ताब्यात घेऊन, दोन शासकीय पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या. पोलीस निरीक्षक यांनी लगेच अॅक्सिस बँक मॅनेजर कैलास वानी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असत्या त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवत असे सांगितल्याने पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करून शितल नगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांचे इमारतीत आरोपीने भाड्याने घर भाड्याने घेतलेले असून तेथे झेराॅक्स करण्याची मशीन व प्रिंटर, कटिंग करण्याची मशीन, नोटा बनवण्यासाठी चा कागद, नोटा मोजण्याचे मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट (सर्व मशिनरीची किंमत सुमारे पाच लाख रुपये),  पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण ७५ बंडल ज्याची किंमत ३७ लाख ५० हजार पाचशे, दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा चे एकूण ४४ बंडल ज्याची किंमत ८ लाख ८० हजार,  पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स (१८ लाख  रुपये किमतीचे) अशा सर्व ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुरनं ७२४/ २०२५ भारतीय न्याय संहिता कलम -१७९,१८०, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. सदर आरोपीविरुद्ध कुर्डवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथे गुरनं नंबर ५०३/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी हे २२ महिने तुरुंगात होते.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोहेकॉ सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदिप ठाणगे, पोकॉ. सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख पथकाने केली असुन सदर पथकास सपोनि. सुदाम शिरसाट, पोउपनि. राजु जाधव, पोहेकॉ. साळवे, शिंदे, पोकॉ. पाखरे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहमदनर यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. संदिप मुरकुटे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे