राहाता (प्रतिनिधी):
राहाता तालुक्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. उभ्या पिकांवर साचलेले पाणी शेतकऱ्यांच्या मेहनतीला वळण देऊन संपूर्ण नुकसान करून गेले असून, उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जफेड, वीजबिल आणि इतर आर्थिक ताण वाढले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या रोजच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांचे कठीण परिश्रम आणि उत्पन्न निसर्गामुळे नष्ट झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी बांधव हतबल झाले असून त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी राहाता तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की तालुक्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत व नुकसानभरपाई कोणत्याही अटीशर्तीशिवाय थेट खात्यात जमा करावी. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करून मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कर्जमाफी, वीजबिल माफी आणि थकलेली अनुदाने तातडीने वाटप करावीत. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुला–मुलींच्या शालेय शिक्षणाची संपूर्ण फी माफ करावी आणि सर्व शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली.
सौ. घोगरे म्हणाल्या, “शेतकरी कर्ज, वीजबिलाच्या ओझ्याखाली दबले असून मदतीशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही. उभ्या पिकांवर साचलेले पाणी शेतकऱ्यांच्या मेहनतीला वळण देऊन संपूर्ण नुकसान करून गेले आहे. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही घोषणा फक्त कागदावर न राहता शासनाच्या ठोस निर्णयातून प्रत्यक्षात दिसावी.” त्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले.
सौ. घोगरेच्या म्हणण्यानुसार, आता शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत, नुकसानभरपाई, कर्जमाफी, वीजबिल माफी आणि थकलेली अनुदाने वितरण करण्याव्यतिरिक्त शालेय शिक्षणासाठीचे आर्थिक भार कमी करणे अनिवार्य आहे, नाहीतर शेतकरी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. “शेतकरी सुरक्षित नाही तर देशाचा अन्नसुरक्षिततेवर देखील प्रश्न निर्माण होतो,” अशा आशयाचे त्यांनी शासनाकडे आवाहन केले.
0 Comments