शिर्डीत यात्रेमध्ये पाळणा तुटल्याने मोठा अपघात! चार जण गंभीर जखमी!

छत्रपती एक्सप्रेस (प्रतिनिधी) शिर्डी येथे श्रीराम नवमी निमित्त यात्रा उत्सव सुरू असताना प्रसादालया समोरील जत्रेतील एक खालीवर‌ होत जमीन समांतर फिरणारा लोखंडी पाळणा तुटल्याने अपघात होऊन चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजे दरम्यान यात्रेत घडल्यामुळे शिर्डीमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डीत सध्या श्रीराम नवमी निमित्त यात्रा उत्सव सुरू आहे. यात्रा उत्सवामध्ये साईप्रसादालया समोरील पटांगणात भव्य यात्रा व विविध दुकाने व मोठी गर्दी यात्रेकरूंची तसेच साई भक्तांची होती. शनिवारी एक एप्रिल 2023 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या परिसरात यात्रेनिमित्त मोठी गर्दी असताना तेथे विविध प्रकारचे राहाट पाळणे ही सुरू होते. या राहाट पाळण्या मध्ये एक जमिनीच्या समांतर वर खाली होत फिरणारा लोखंडी पाळणाही सुरू होता. त्यामध्ये अनेक जण बसलेले होते. मात्र अचानक हा पाळणा तुटला. त्यामुळे या पाळण्यामध्ये बसलेले बाहेर फेकले गेले .बाहेर या पाळण्यात बसण्यासाठी उभे असणारी अनेक जण होते. त्यांच्यावरही हा पाळणा आदळला .त्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात ज्योती साळवे, किशोर साळवे ,भूमी साळवे, तसेच प्रवीण आल्हाट आदी चार जण जखमी झाले आहेत .दोघांच्या पायाला जास्त मार लागला असून भूमी साळवेच्या डोक्याला मार लागल्याचे समजते . इतरही काही किरकोळ जखमी झाले आहेत.या जखमींना तात्काळ शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक व डॉक्टर प्रीतम वडगावे हे तात्काळ तेथे उपस्थित झाले. त्याचप्रमाणे डॉक्टर खुराणा, डॉक्टर तलवार, डॉक्टर पारखे, आदीसह काही डॉक्टर तेथे येऊन जखमेवर तातडीने उपचार सुरू केले. शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ प्रथम घटनास्थळी व नंतर हॉस्पिटलला दाखल झाले. या घटनेमुळे शिर्डीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
या घटने संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी म्हटले की, ही घटना शनिवारी रात्री सुमारे साडेआठ वाजेच्या दरम्यान पाळणा तुटून घडली आहे. चार जण जखमी असून जखमेवर उपचार तातडीने होत आहेत .या पाळण्याचा अपघात कसा झाला, त्याची पाळणामालकाने प्रॉपर देखभाल किंवा रिपेरिंग व्यवस्थित केली की नाही, याची चौकशी होईल. दोषीआढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यात्रेला या घटनेमुळे काहीसे गालबोट लागल्याचीही चर्चा होती.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!