देशात लोकसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व दक्षिण नगर लोकसभेची निवडणुक होत असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे सर्वांनी पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करू नये. अन्यथा कडक कारवाई केली जाईल.असा इशारा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्याने या शिर्डी मतदारसंघातही आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या सूचनांसाठी व नियमांची सखोल माहिती देण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नियुक्त अधिकारी ,कर्मचाऱ्यांची राहता तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील ,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे ,शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर ,पोस्टर काढण्यात येऊन अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी आचारसंहितेच्या अनुवंशाने निर्गमित केलेले आदेश व निर्देश यानुसार विनापरवाना खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुप करणे यावर बंदी घातलेली आहे. अशा प्रकारच्या राजकीय पक्ष ,उमेदवारांनी ,खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुप केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, व्यक्तिपत्रके ,घोषणा ,झेंडे, कापडी फलक व चिन्ह इत्यादी काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. अन्यथा तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील. या निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका नको, धार्मिक तेढ निर्माण होईल असे विधान केले जाऊ नये . कोणत्याही उमेदवाराला, मतदारांना धमकवता येणार नाही .प्रचार सभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची असून आदर्श आचारसंहितेच्या नियमाच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल. उमेदवाराला धर्म, जातीवर मतदान मागता येणार नाही . समाजात तेढ निर्माण होईल . अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही. याची काळजी घ्यावी लागणार असून प्रचारात लहान मुलांचा वापर करता येणार नाही. असे अनेक नियम असून सरकार, अधिकारी, नेते मंडळी आणि राजकीय पक्षांसाठी नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे सर्वांनी पालन करावे. असे आवाहन करत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीपद्वारे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य ,शाळा व कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात यावी. मतदारांनी जिल्ह्यामध्ये अधिकाधिक मतदान कसे होईल . मतदानाची टक्केवारी कशी वाढेल. आणि भयमुक्त मतदान होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी माणिक आहेर यांनी यावेळी केले. या बैठकीला शासकीय ,निम शासकीय अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments