सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करून न्याय देणार--- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोपरगाव ( प्रतिनिधी)
येत्या निवडणुकीत तुम्ही सरकार बदलण्याचा निर्धार करा व सरकार बदलून दाखवा, जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू, असे स्पष्ट आश्वासन माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धवजी ठाकरे यांनी दिले.
अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी समाधी मंदिर शेजारील भव्य मंडपात आयोजित  जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,खासदार संजय राऊत ,खासदार सुभाष देसाई ,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मिलिंद नार्वेकर ,आमदार सत्यजित तांबे, रविकांत तुपकर, संघटनेचे अध्यक्ष खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत श्री साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते शिर्डीहून कोपरगावला या कार्यक्रमाला आले.
येथे अधिवेशन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे  पुढे म्हणाले, ही जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून खेचून आणू. तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे. आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात, लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता, तरी योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात, असे म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हेत, निवडणुका जवळ आल्या की यांनी लाडकी बहीण योजना काढली, असा टोला त्यांनी लगावला आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी जिवावर उदार होऊन कामे केलीत म्हणून महाराष्ट्र वाचला आहे. तरी सुद्धा हे सरकार तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही. आपले सरकार पुन्हा आणा, आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,   दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या डायलॉग प्रमाणे  मेरे पास मा है, तसंच मी सांगतोय मेरे पास ईमान है,  सत्ता नसतानाही तुम्ही मला बोलावत आहात आणि मी सुद्धा आलो आहे. कारण मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना पहिल्याच कॅबिंनेटमध्ये लागू करण्यात येईल. असे आश्वासन देत कोपरगाव बेट हे साईबाबांची तपोभूमी असून तुम्हाला साईबाबा नक्कीच न्याय देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार सुभाष देसाई यांची भाषणे झाली. जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष खांडेकर यांनीही यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या मागण्या विस्तृतपणे मांडल्या. प्रास्ताविक गोविंद उगले यांनी केले.
या अधिवेशनाला राज्यातील मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी पेन्शनधारक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे