राहाता / प्रतिनिधी : लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्गातून संतापाचे वातावरण असतानाच एका चांगल्या निर्णयाने शेतकरी वर्गाची चिंता आता काही प्रमाणात मिटणार आहे. राहाता बाजार समीतीला शासकीय खरेदी केंद्र मंजूर झाल्याने सोयाबीनची हमीभावात विक्री आता होवू शकणार आहे.
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन पिकाच्या उत्पादनाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नाला यश आले आहे. त्यानुषंगाने राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय खरेदी केंद्र मंजूर झाले असून आता सोयाबीन शासकीय हमीभावाने म्हणजेच प्रती क्विंटल ४८०० ने खरेदी करणार असून शेतकऱ्यांना हमीभावाच्या रुपात पैसे मिळतील असा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असुन महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे सुतोवाच डॉ सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
या निर्णयाने नक्कीच या निवडणूकीत शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत असुन महायुतीचे मताधिक्य आणखी वाढणार असल्याचा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments