शिर्डी (प्रतिनिधी) आज संपूर्ण महाराष्ट्रा बरोबर शिर्डी व परिसरातही वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात, ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.
यंदाची वटपौर्णिमा शुक्रवार 21 जून 2024 असल्याने या दिवशी वटसावित्रीचे व्रत सर्वत्र पाळण्यात आले. हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यातील या पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. त्यामुळे आज या वटपौर्णिमेच्या दिवशी ठिकठिकाणी महिलांकडून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करण्यात येत होती. यादिवशी वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती देव वास्तव्य करतात. असे मानले जाते. व तशी श्रद्धा आहे.त्यामुळे वट सावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक व पौराणिक श्रद्धा व कथा आहे.
या पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्यतेने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल, असे वरदानही दिल्याचे मानले जाते. म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वट सावित्री व्रत आहे.
आज शुक्रवारी वटपौर्णिमा असल्यामुळे शिर्डी व सावळीविहीर परिसरातही ठिकठिकाणी असणाऱ्या वटवृक्षाची महिलांकडून पूजा करण्यात येत होती. वडाच्या वृक्षाला दोरा म्हणजे सूत बांधून ,आंबे ,केळी आदी फळे, फुले ,पाने ठेवून हळदीकुंकू वाहून, नैवेद्य दाखवून, दिवे लावून पूजा करण्यात येत होती. वटपौर्णिमेचा मोठा उत्साह दिवसभर सर्वत्र दिसून येत होता.
0 Comments